वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे वाहनतळ अशा परिस्थितीमुळे वारंवार ‘कोंडी’त सापडणाऱ्या ठाणेकरांच्या पार्किंगचा पेच सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. यापुढे बांधकाम प्रकल्प विकसित करताना एखाद्या विकासकाने महापालिकेस सर्व सुविधांसह वाहनतळ उभारून दिल्यास संबंधित विकासकास वाढीव चटईक्षेत्र मंजूर करण्याचा निर्णय शहर विकास विभागाने घेतला आहे. यामुळे ठाण्यातील वाहने पार्किंगचा प्रश्न मिटण्याची शक्यता असली तरी बिल्डरांना मात्र निश्चितच मोकळे रान मिळणार आहे.
पालिकेने शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत तसे फेरबदल केले असून या प्रस्तावामुळे ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, गोखले मार्ग अशा गर्दीच्या ठिकाणी बिल्डरांमार्फत वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. वाहनतळ उभारताना नजीकच असलेल्या रेल्वे स्थानक, बस डेपो, प्रार्थनास्थळ अशा सार्वजनिक ठिकाणी एखादा जोडरस्ता, भुयारी मार्ग, स्कॉयवॉक अशा सुविधाही बिल्डरला उभारून द्याव्या लागणार आहेत. या बदल्यात बिल्डरला घसघशीत चटईक्षेत्र अथवा विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) पदरात पाडून घेता येणार आहेत.
वाहनतळांचे पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे जागोजागी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यात येऊ लागली आहेत. जुन्या ठाणे शहरात तर वाहनतळ उभारणीसाठी जागाच उपलब्ध नाही, असे चित्र आहे. त्यामुळे एखादा विकासक पुढे आल्यास त्याच्यामार्फत असे वाहनतळ उभे करून घ्यायचे, अशी योजना आहे. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून तिच्यामार्फत अशा प्रकारे वाहनतळांची आवश्यकता कुठे आहे, याचे सर्वेक्षण करून ठरावीक झोन प्रस्तावित केले जाणार आहेत. या विभागांमध्येच पार्किंगसाठी वाढीव चटईक्षेत्र देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ही योजना राबविताना कमीत कमी दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड असणे आवश्यक असून अशा भूखंडांवर जेवढय़ा भागात वाहनतळ उभारले जाईल, त्याप्रमाणात वाढीव चटईक्षेत्र किंवा विकास हस्तांतरण हक्क प्रदान केले जाणार आहेत. असे चटईक्षेत्र त्याच ठिकाणी उपयोगात आणण्याची परवानगी बिल्डरला देण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा