लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विधि अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा यावर्षीपासून सामाईक विधि प्रवेश परीक्षेच्या (क्लॅट) धर्तीवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे विधि अभ्यासक्रमांची परीक्षा १५० ऐवजी १२० गुणांची घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा दोन तासांची असणार आहे.

राज्यातील विधि तीन तीन वर्ष आणि विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेण्यात येते. मात्र राष्ट्रीय विधि विद्यापीठांमधील विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या सामाईक विधि प्रवेश परीक्षेच्या (क्लॅट) धर्तीवर राज्यातील प्रवेश परीक्षा घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून विधि तीन वर्षे आणि विधि पाच वर्षे प्रवेश परीक्षेत बदल केला आहे. नव्या बदलानुसार विधि तीन वर्षे आणि विधि पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा १५० ऐवजी १२० गुणांची घेतली जाणार आहे. परीक्षा ही दोन तासांचीच असणार आहे. दरम्यान परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाना दिलेले महत्त्व कायम असणार आहे.

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क या विषयासाठी २४ गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यासंदर्भातील प्रश्नांसाठी ३२ गुण, तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्नासाठी २४ गुण आणि इंग्रजी विषयासंदर्भातील प्रश्नासाठी ४० गुण असणार आहेत. त्याचप्रमाणे विधि पाच वर्ष अभ्याक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क या विषयासाठी ३२ गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यासंदर्भातील प्रश्नांसाठी २४ गुण, तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी ३२ गुण आणि इंग्रजी विषयासंदर्भातील प्रश्नासाठी २४ गुण, गणित विषयासाठी ८ गुण असणार आहेत.

शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये विधि तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी १९ हजार ३४१ जागांसाठी राज्यभरातून ५२ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तर ५९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या १२ हजार ७३१ जागांसाठी ३४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २६ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Format of law cet exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150 mumbai print news mrj