मुंबई : अंतर्गत सुरक्षेसाठी आपल्याला खूप सतर्क राहावे लागते. आपल्या आजूबाजूला नेमके काय घडत आहे, याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. बाह्य सुरक्षेपेक्षा अंतर्गत सुरक्षा ही आव्हानात्मक असते. आपण एकत्र नाही राहिलो तर येथील अंतर्गत वादांचा फायदा इतर देश घेतील. ही परिस्थिती टाळण्यासाठी फक्त सीमेवरील जवान पुरे ठरणार नाहीत, तर प्रत्येक नागरिकानेही सतर्क राहून त्यासाठी योगदान द्यावे. या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपली अधिक प्रगती होईल’, असे स्पष्ट मत माजी लष्करप्रमुख मनोज एम. नरवणे यांनी गुरूवारी व्यक्त केले.
आयआयटी मुंबईच्या पवईतील संकुलात आशियातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव असलेल्या ‘टेकफेस्ट’चा जागर सुरू आहे. ‘टेकफेस्ट’अंतर्गतच्या व्याख्यानमालेत गुरुवार, २८ डिसेंबर रोजी माजी लष्करप्रमुख मनोज एम. नरवणे, माजी नौदलप्रमुख करमबीर सिंग आणि माजी हवाईदल प्रमुख आर.के.एस भदौरिया यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा >>> भारतासाठी ‘हवामान उपग्रहा’ची निर्मिती जानेवारी २०२४ मध्ये प्रक्षेपण- इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस.सोमनाथ यांचे प्रतिपादन
यावेळी ‘अग्निपथ’ योजनेबाबत विचारले असता त्यावर उत्तर देताना तिन्ही दलांचे माजी प्रमुख म्हणाले, ‘मनुष्यबळाच्या नियोजनाबाबत नवनवीन धोरणे ही येत असतात. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत चार वर्षांच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या तरुणाची निवड ही नियमितपणे लष्करात होऊ शकते. येत्या काळात गरज पडल्यास ‘अग्निपथ’ योजनेतही बदल होऊ शकतो’. ‘राष्ट्रीय सुरक्षा म्हटल्यावर लष्कर, नौदल आणि हवाईदल लक्षात येते. पण राष्ट्रीय सुरक्षा हे एक मोठे आव्हान असून ऊर्जा, अन्न , आरोग्य, प्रगत तंत्रज्ञान, सायबर, राज्य पोलीस आणि रेल्वे पोलीस हे सर्व राष्ट्रीय सुरक्षेचाच भाग आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ आमची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, हे माहित असणे गरजेचे आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण काय योगदान देतो, या गोष्टीचाही विचार केला पाहिजे. एकंदरीत हीच राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना आहे’, असे प्रतिपादन नरवणे यांनी केले.