लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आपहराप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिमन्यू सुरेंदर भोनला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. १२२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी ही तिसरी अटक आहे.
बँकेतून काढण्यात येणाऱ्या रोखेप्रकरणी वेळोवेळी भोनला हिस्सा मिळत होता, असा आरोप आहे. याआधी बँकेचे महाव्यवस्थापक आणि प्रमुख लेखापाल हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मेहतावर बँकेच्या तिजोरीतील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्यामार्फत गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक पौनला मिळाल्याचा आरोप आहे. आरोपी पौनने रिझर्व्ह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत कबुली दिली होती. दोन्ही आरोपींना याप्रकरणी रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता (५७) याला शनिवारी अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला शनिवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पौन हा कांदिवली पश्चिम येथील श्रीजी शरण या इमारतीत वास्तव्याला आहे. १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये आरोपी महाव्यवस्थापक मेहता याच्याकडून पौनला मिळाले होते. हा प्रकार २०१९ पासून सुरू असून मेहता देत असलेल्या रकमेचा वापर तो बांधकाम व्यवसायात करीत होता. आरोपी पौनला डिसेंबर २०२४ मध्ये एक कोटी ७५ लाख व जानेवारी २०२५ मध्ये ५० लाख रुपये मेहतामार्फत मिळाले होते. या गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये पौनच्या ताब्यात असून याबाबत दोन्ही आरोपींनी आरबीच्या अधिकाऱ्याना कबुली दिली आहे.
याप्रकरणात उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूण भाई नावाच्या व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रभादेवी व गोरेगाव येथील शाखेतील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. त्यात बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींना रविवारी सुटीकालीन न्यायालयापुढे हजर केले असता मेहता व पौन यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हितेश मेहताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.