मुंबई : ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या (यूपीए) सरकारमध्ये सोनिया गांधी हे दुसरे सत्ताकेंद्र असल्याचा चुकीचा प्रचार करण्यात आला. प्रत्यक्षात सोनिया यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामांत कधी हस्तक्षेप केला नाही. मात्र पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागाराने असत्य माहितीवर पुस्तक लिहून मनमोहन सिंग यांचा विश्वासघात केला, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज संस्थेने बुधवारी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यावेळी चव्हाण म्हणाले, १९९१ ते ९६ या काळातील अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणांवर आपण नेहमी बोलतो. मात्र सिंग यांनी अमेरिकेबरोबर २००८ मध्ये जो अणुकरार केला, त्यामुळे भारताच्या अणुइंधनाचा प्रश्न मिटला. ऊर्जा निर्मितीत वृद्धी झालीच, पण अण्वस्त्र निर्मितीचा आपला कार्यक्रम पुढे गेला. मनमोहन सिंग यांनी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात कमीपणा मानला नाही. त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता, असेही ते म्हणाले.
मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या दर शुक्रवारी बैठका होत. दोघांतील दुवा म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. कधी कुणाच्या बदलीबाबत सोनियांनी सांगितले नाही. फक्त एकाच गोष्टीचा सोनियांचा आग्रह असे, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मंडळींना दूर ठेवा, असे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा >>>अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावरील श्रद्धांजली सभा घेतली नाही, त्यामुळे माझ्या संस्थेला घ्यावी लागली, अशी खंत माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. सभेनंतर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘फायदे काँग्रेसकडून, पाठिंबा भाजपला’
‘ज्या मध्यमवर्गीयांना सायकलची मारामार होती, त्यांच्याकडे आज दोन मोटारी आहेत. चाळीत राहणारे मध्यमवर्गीय आज आलिशान सदनिकेत राहतात. १९९१ मध्ये आपले कुटुंब कसे होते आणि २०११ मध्ये काय झाले याचा भारतीय मध्यमवर्गाने विचार करावा. पंडित नेहरू यांनी स्थापन केलेल्या ‘आयआयटी’त शिकून अमेरिकेत गेलेली मध्यमवर्गीयांची मुले आज नेहरूविरोधी आहेत. सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी काँग्रेस, नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडून फायदे घेतले, मात्र आज ते पाठिंबा भाजपला देतात,’ अशी टीका माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी केली.