नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना साहित्य, कला, संस्कृती यांची विशेष आवड होती. राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, अशीही त्यांची ओळख होती. हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचे संकलन.
साहित्यसंमेलन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक मोठा सोहळा आहे. या सोहळ्यात सामील होण्याकरिता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक पंडित, प्राचार्य, साहित्यिक आणि सामान्य रसिक दर वर्षी गोळा होतात आणि हा संमेलन-सोहळा साजरा करतात. या संमेलनाच्या सोहळ्यामध्ये मलाही आपण या वर्षी सामील करून घेतले आहे त्याबद्दल स्वागत मंडळाचा मी मनापासून आभारी आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी त्यांच्या सत्कार समारंभातून जो एक फार चांगला विचार मांडला आहे, त्याची मला आज आठवण झाली. मला समीक्षा आवडत नाही, साहित्य आवडते असे ते या सत्कार समारंभातून म्हणाले. हा त्यांनी फार चांगला विचार सांगितला. पण विचाराची हीच पद्धत पुढे चालू ठेवायची झाली तर असे म्हणता येईल की, साहित्य हेसुद्धा एका अर्थाने जीवनाची समीक्षा आहे. साहित्यनिर्मिती करावी, पण खरे म्हणजे जीवनावरचा लोभ सोडू नये. जीवनावरचे प्रेम कायम ठेवावे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या सगळ्याच माणसांचा नाही म्हटले तरी साहित्याशी संबंध येतो. मग हे काम जीवनाच्या कोठल्याही क्षेत्रांतील असो. शब्दांच्या मदतीशिवाय ते आपणास पार पाडता येत नाही. शब्दांचा वापर करून त्यांच्यामार्फत विचार मांडायचा असतो. मग हे प्रकटीकरण कोणी लेखनाद्वारे करील किंवा कोणी वाचेद्वारे करील. पण या प्रकटीकरणातूनच शेवटी साहित्यनिर्मिती होत असते. निव्वळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य ही साहित्याची व्याख्या घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा काळ संपलेला आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कोणी घालू शकेल असे मला वाटत नाही.आता येथे कोणीसे म्हटले की, इतर भाषा-भगिनींच्या साहित्य-जीवनाशी संपर्क ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे; परंतु अशा प्रकारचा संपर्क ठेवून आमच्या साहित्यात फारसा फरक होईल, असे मी मानीत नाही. मला वाटते, याच्याही पुढे आपण जावयास हवे. अधिक स्पष्ट करून बोलायचे म्हणजे तिथल्या प्रत्यक्ष जीवनाशी संपर्क न ठेवता, केवळ तिथल्या भाषाभगिनींशी संपर्क साधून साहित्यातील आपले संबंध अधिक जिव्हाळ्याचे होतील हे म्हणणे मला खरे वाटत नाही. भारत किती विशाल आहे, याचा अनुभव भारतातत्या त्या त्या विभागांतील जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न केल्याशिवाय येत नाही. आपल्यापैकी जी माणसे बाहेर हिंडतात, फिरतात त्यांना हा अनुभव येत असेल.
आमच्या अनुभूतीच्या ज्या मर्यादा आहेत त्यांचा याहीपेक्षा अधिक विकास झाला पाहिजे, त्या अधिक विस्तारल्या पाहिजेत. कारण साहित्य हे एक सामथ्र्य आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात जी आव्हाने येतात ती ती आव्हाने झेलण्याचे सामथ्र्य जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येते तेव्हा राष्ट्र मोठे होते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, पण सामथ्र्य हे कशाने प्राप्त होते? हे सामथ्र्य शस्त्राने प्राप्त होत नाही, बंदुकीच्या
गोळीने प्राप्त होत नाही. हे सामथ्र्य विचारांतून येते, संस्कारातून येते. हे विचार आणि हे संस्कार देण्याचे काम भाषेमार्फत, साहित्यामार्फत घडते, म्हणून साहित्याचे मोल जास्त आहे, असे मी मानतो आणि म्हणून हे सामथ्र्य वाढविण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला पाहिजे.
सामथ्र्य-संवर्धनाचे हे काम आज साहित्यिकांनी केले पाहिजे, साहित्यिकांची ही भूमिका असली पाहिजे. मग ते साहित्यिक मराठी असोत, गुजराथी असोत, तेलगू असोत किंवा इतर अन्य भाषिक असोत. मी तर असे म्हणेन की, हिंदुस्थानातील निरनिराळ्या भाषांतून लिहिणाऱ्या लेखकांच्या पुढे आज हे एकच काम आहे. स्थानिक स्वरूपाचे काही वेगवेगळे प्रश्न असतील, स्थानिक स्वरूपाचे काही वेगवेगळे तात्पुरते रागलोभ असतील; परंतु विसाव्या शतकातील हिंदुस्थानपुढे असणारे प्रश्न पाहण्याचा जो कोणी प्रयत्न करील त्याला असे आढळून येईल की, हिंदुस्थानचे महत्त्वाचे प्रश्न येथून तेथून एकच आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्याची शक्ती समाजाच्या जीवनामध्ये निर्माण करणे हे साहित्यिकांचे महत्त्वाचे काम आहे.
लेखक आपल्या अनुभवाच्या आत्मप्रत्ययातून लेखन करण्याचा प्रयत्न करतो, पण हा अनुभव एकाच विशिष्ट विभागापुरता मर्यादित न राहता देशव्यापक झाला पाहिजे. त्याने या मर्यादित सीमा ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केल्याशिवाय या देशाला एकभारतीयत्व देण्याची आज जी गरज आहे असे मी मानतो, ती पुरी होणार नाही. त्यासाठी आमचे जे काही दुरभिमान असतील ते आम्ही सोडले पाहिजेत, आमचे जे आग्रह असतील ते आम्ही बाजूला ठेवले पाहिजेत आणि इतरांचे प्रश्न समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे आणि हे काम साहित्यिकांनी करावयाचे आहे. एक अनुभूती आणि एक विचार राबविण्याचे हे जे काम आहे ते अविभाज्य आहे. ते केवळ मराठीचे, बंगालीचे, तेलगूचे किंवा कानडीचे नसून भारतातील सर्वच भाषांचे ते काम आहे. ही अविभाज्यता, ही एकरूपता अनुभवाला आली पाहिजे आणि हा अनुभव साहित्यिकांना त्यांच्या जीवनामध्ये आला तरच तो ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.
(कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ‘युगांतर-निवडक भाषणे १९६२ ते १९६९’-यशवंतराव चव्हाण’ या पुस्तकावरून साभार)