मुंबई : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना विरोधी नेत्यांना करण्यात आलेली अटक, प्राप्तिकर विभागाच्या राजकीय पक्षांना नोटिसा, विरोधकांच्या प्रचारात जाणीवपूर्वक निर्माण केले जात असलेले अडथळे, आणखी काही विरोधी नेत्यांना अटक होणार अशी सुरू असलेली चर्चा या पार्श्वभूमीवर १९७७ प्रमाणे लोकांनीच निवडणूक हातात घ्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
फक्त विरोधी नेत्यांवर कारवाई केली जात आहे. काही डाव्या नेत्यांनाही ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नोटीस बजाविली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकांच्या हंगामात विरोधकांना अशा पद्धतीने कधीच त्रास दिला गेला नव्हता. मोदी यांना विजयाची खात्री नसल्यानेच विरोधकांना लक्ष्य केले जात असावे, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
सत्ताधाऱ्यांच्या या दंडेलशाहीला प्रत्युत्तर देण्याकरिता लोकांनीच ही निवडणूक हातात घ्यावी, असे मत चव्हाण यांनी मांडले. १९७७ मध्ये लोकांनी अशाच पद्धतीने निवडणूक आपल्या हातात घेतली होती. पंतप्रधानपदाचा कोणीही चेहरा नसताना इंदिरा गांधी यांच्याविरोधात जनतेने कौल दिला होता. आताही जनतेने लोकशाहीची सारी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
‘साताऱ्यात राष्ट्रवादीकडून लढणार नाही’
सातारा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने सादर करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी रविवारी आपली भेट घेऊन चर्चा केली. आपण राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आहे. पण आपण राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढविणार नाही. साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडली आणि पक्षाने आपल्या उमेदवारीला मान्यता दिल्यास लढण्याची आपली तयारी असल्याचे चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.