ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच सध्या काँग्रेसच्या वाटेवर असलेले मदन कदम यांच्यासह चार जणांना गुजरात पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या चौघांकडून १२ पिस्तुले जप्त करण्यात आल्या असून ही शस्त्रे त्यांनी राजस्थान येथून आणल्या आहेत. तसेच या पिस्तुलांची ठाण्यात विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देत या संबंधीची माहिती गुजरात पोलिसांकडून मिळाल्याचे सांगितले.
मदन कदम (रा. ठाणे), त्यांचे मित्र राजेश कोठारी (रा. नालासोपारा), भगवान सावंत (रा. पाटण) आणि मोहम्मद उमर (भाइंदर), अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या चौकडीकडे बेकायदा शस्त्रे असल्याची माहिती गुजरातमधील शामलाजी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे या पोलिसांच्या पथकाने गुजरात-राजस्थान राज्याच्या सीमेवरच या चौघांना अटक केली. दोन दिवसांपूर्वी या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
या चौघांनाही न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या चौघांनी राजस्थान येथून शस्त्रे घेतली होती आणि ती ठाण्यात विक्रीसाठी आणण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली, असेही सूत्रांनी सांगितले.

कदम कॉंग्रेसच्या वाटेवर?
कदम हे ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेचे विभागप्रमुख आणि पाटण संपर्क प्रमुखपदही त्यांच्याकडे होते. महापालिका निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली होती. शिवसेनेपासून दुरावल्यामुळे सध्या ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.