मुंबईः मालमत्तेच्या खरेदीच्या व्यवहारात १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातील रिअल इस्टेट कंपनी आणि तिच्या तीन संचालकांविरुद्ध १४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी कंपनीचे एक संचालक सुरेश परुळेकर गोव्यातील माजी मंत्री आहेत.
मुंबईमधील ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये जून महिन्यात याप्रकरणी रेईश-मागूश रिअल इस्टेट कंपनीचे संचालक व माजी मंत्री सुरेश परुळेकर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेश परुळेकर यांच्यासह प्रसाद परुळेकर आणि मंदा सुरेश परुळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून हे तिघेही कंपनीचे संचालक आहेत. गुन्हा दाखल झाल्यानतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. गोव्यातील डिचोली येथील रहिवासी असलेल्या प्रेमचंद गवस यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गवस यांनी जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या काळात परुळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये १४ कोटी ९० लाख रुपये दिले होते. ठरावीक कालावधीत गवस यांना जमीन मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
हेही वाचा… कामा रुग्णालयामध्ये बहरणार दुसरे मियावाकी जंगल
आरोपींनी सब-रजिस्ट्रारशी संगनमत करून जमीन विक्री कराराची नोंदणी केली नाही. आरोपींनी जमिनीच्या सुरळीत खरेदीसाठी तयार केलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये काही फेरफार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जमिनीचा व्यवहार ताडदेव येथील बेसाईड मॉलमधील कार्यालयात झाल्यामुळे याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फौजदारी विश्वासभंग, फसवणूक केल्याप्रकरणी जून महिन्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गोव्यात दाखल झाले आहे.