Kedar Jadhav joins BJP in Mumbai : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो क्रिकेट समालोचन करताना दिसत होता. मात्र, आता त्याने थेट राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. त्याने मंगळवारी (८ एप्रिल) मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केदारने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर केदार जाधव म्हणाला, “२०१४ ला केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, तेव्हापासून त्यांना देशातील नागरिकांकडून ज्या पद्धतीचं प्रेम मिळालं आहे, त्यांना जनतेचं जितकं समर्थन मिळालं आहे, त्या समर्थनाच्या जोरावर त्यांनी देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांत कुठल्याही सरकारला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत करून दाखवलं आहे.”
केदार जाधवची मोदी व फडणवीसांवर स्तुतीसुमने
केदार जाधव म्हणाला, “नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत देशाचा खूप विकास केला आहे. आता आपण विकसित भारताच्या दिशेने जात आहोत. मोदीनी जसा देशाचा विकास केला तसाच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास केला आहे. त्यांनी देखील अनेक मोठी कामं केली आहेत. आतापर्यंतच्या कित्येक सरकारांना जमलं नाही ते केंद्रात नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे.”
केदार भाजपा पक्षप्रवेशाचं कारण सांगत म्हणाला…
भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव म्हणाला, “मला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचं काम पाहून खूप प्रेरणा मिळते. त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. माझं आता एकच ध्येय आहे, देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी जे काही करता येईल ते सगळं मला करायचं आहे. या प्रगतीसाठी नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासारखे तरुण अशा एखाद्या नेतृत्वाच्या पाठी उभे राहतात. राज्याची व देशाची सेवा करण्यालायक बनतात. आपल्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपात ते नेतृत्व आहे. महाराष्ट्राकडे देवेंद्र फडणवीस आहेत”.