लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर विभागाने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतन तिरोडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक चित्रफीत समाजमाध्यमावर अपलोड केली होती. तसेच फडणवीस ड्रग माफियांना मदत करतात आणि ते ड्रग माफियांवर कठोर कारवाई करत नाहीत, असा आरोपही तिरोडकर यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर विभागाने माजी पत्रकार तिरोडकर यांच्या विरोधात प्रॉडक्शन वॉरंट काढले होते. त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून तिरोडकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात
दरम्यान, गेल्या आठवड्यात तिरोडकर यांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांनी काही बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. चित्रफितीमध्ये त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांचे अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.
केतन तिरोडकर कोण ?
केतन तिरोडकर हे माजी पत्रकार व आरटीआय कार्यकर्ते आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांनी आजवर विविध प्रश्न उपस्थित केले. तिरोडकर यांनी नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केले होते. तसेच मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणारी घरे, मुंबईवरील शिक्षा २६/११चा दहशतवादी हल्ला, न्यायमूर्तींच्या घरांसाठी भूखंड आरक्षणाचा वाद, आदर्श इमारत घोटाळा, मराठा आरक्षण आदी विविध प्रश्नांवर उच्च न्यायालयात जनहित याचिका करून तिरोडकर हे चर्चेत राहिले आहेत. या गोष्टींमुळे ते अनेकदा अडचणीतही सापडले. मुंबई उच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह विधाने करून त्यांची बदनामी करणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तिरोडकर यांना यापूर्वी शिक्षा सुनावण्यात आली होती.