अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात छातीत दुखणे तसेच चक्कर आल्यामुळे शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. देशमुख यांची स्थिती स्थीर असून त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आल्या. देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

आर्थर रोड तुरुंगात छातीत दुखणे व चक्कर येत असल्याची तक्रार देशमुख यांनी केली. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ईसीजी अहवाल ठीक नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्यावर्षी २१ एप्रिलला भ्रष्टाचाराप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे गेल्यावर्षी ११ मे रोजी ईडीने याप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. याप्रकरणी देशमुख यांना ईडीने गेल्यावर्षी १ नोव्हेंबरला अटक केली होती. सध्या ते न्यायबंधी म्हणून आर्थररोड तुरुंगात आहेत.