मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल आला. या प्रकरणी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात धमकीसाठी दूरध्वनी आला होता.

झिशान सिद्धीकी यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ई-मेल येत असून त्यात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने १० कोटी रुपयांच्या खंडणीचा तसेच दाऊद टोळीच्या नावाचाही उल्लेख केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण पोलिसांनी याबाबत कोणताही अधिकृत दुजोरी दिलेला नाही.

पहिल्या ई-मेल नंतर सहा तासांनी पुन्हा दुसरा धमकीचा ई-मेल आला आहे. या प्रकरणी झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानंतर वांद्रे पोलिसांनी झिशान सिद्दीकी यांच्या घरी येऊन त्यांचा जबाब नोंदवला. याप्रकरणी आम्हाला तक्रार आली असून पोलीस पुढील चौकशी करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ऑक्टोबर महिन्यात झिशान व अभिनेता सलमान खान यांना धमकी देण्यात आली होती. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात याबाबत दूरध्वनी आला होता. निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता धमकी देणाऱ्याने झिशान सिद्दीकी व सलमानला धमकी दिली, असे सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखाही याप्रकरणी तपासणी करत आहे. ईमेल कंपनीकडून माहिती घेण्यात येणार आहे.

बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेरच लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकी यांची हत्या झालेल्या कार्यालयाबाहेर धमकीचा दूरध्वनी आला. याबाबत पोलिसीस तपास करत आहेत.