मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचाही आरोप आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.
किशोरी पेडणेकरांचं ट्वीट
“किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलं आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र चालू झालेल आहे. SRA गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एसआरए प्राधिकरणाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवलं आहे,” असं ट्वीट किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
किशोरी पेडणेकर यांनी सोबत प्रतिज्ञापत्राची प्रतही शेअर केली आहे.
किरीट सोमय्यांनी काय आरोप केले आहेत?
”एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना दादर पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. जर त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, त्या या चौकशीला का घाबरत आहेत? ठाकरे सरकार असताना मी या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिले होते. तसेच वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्याचे पुरावेही दिले होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे त्यांची चौकशी झाली नाही”, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
एसआरएमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करत सदनिका बळकावल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर केला आहे. ”गोमाता जनता एसआरए वरळी येथे सदनिका बळकावण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली असून त्यांच्या कुटुंबातील कदम यांनी मूळ लाभार्थी संजय अंधारी यांच्या नावाने स्वाक्षरी करत खोटी कागदपत्रे सादर केली”, असेही ते म्हणाले.
“काल रात्री मी या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तसेच एसआरएचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांनीही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या घोटाळ्यासह करोना काळात केलेला घोटाळा असेल किंवा बेनामी संपत्ती प्रकरण असेल, या सर्व प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करावी”, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.
किरीट सोमय्या यांनी कथित घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे माध्यम प्रतिनिधींसमोर सादर केली. तसंच पेडणेकर काल (२९ ऑक्टोबर) हातात कुलूप घेऊन सदनिका बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पुढील वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळू शकतो, असा खोचक टोला लगावला आहे.
दादर पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स
दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.