मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार असून मतदार नोंदणीस सुरुवात झाली आहे. या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या माजी अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या युवा सेनेचे ५ माजी अधिसभा सदस्य शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. परिणामी, आगामी काळात अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेला कितपत फटका बसतो, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘माझे पती दिवंगत दिलीप करंडे यांनी ३० ते ३५ वर्षे शिवसेनेसाठी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या विविध अंगीकृत संघटनांवरही त्यांनी काम केले. शिवसेना, दिलीप करंडे आणि मुंबई विद्यापीठ हे समीकरणच झाले होते. त्यांच्या निधनानंर मी कामाच्या प्रवाहात आले आणि संघटना बांधणीच्या कामात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले. कालांतराने मला नेतृत्व, तसेच काम करण्याची संधी कमी मिळत गेली. या पार्श्वभूमीवर समोरून काम करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणीही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहेत. मला सातत्याने काम करायचे आहे. मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक, तसेच विविध निवडणुकांच्या प्रवाहात मी नक्कीच राहणार आहे’, असे डॉ. सुप्रिया करंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा… मुंबई : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मुदतीत बांधकाम पूर्ण न केल्यास दंड
हेही वाचा… मुंबईः पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
मुंबई विद्यापीठाच्या मागील पंचवार्षिक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने सर्व दहापैकी दहा जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. डॉ. सुप्रिया करंडे या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. तर खुल्या प्रवर्गातून विजयी झालेले प्रवीण पाटकर, महादेव जगताप व राखीव प्रवर्गातून विजयी झालेले निखिल जाधव, तसेच राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्य वैभव थोरात यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पाच माजी अधिसभा सदस्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निश्चय शिंदे गटाच्या युवा सेनेने केला आहे, त्याचबरोबर ठाकरे गटाच्या युवा सेनेनेही निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची अधिसभा निवडणूक चुरशीची ठरणार हे निश्चित असून या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.