चिपळूण साहित्य संमेलनातील विविध परिसंवाद व कार्यक्रमात अपवाद वगळता मान्यवर व दिग्गज साहित्यिकांची अनुपस्थिती जाणवणार आहे. त्याचबरोबर आता काही माजी संमेलनाध्यक्षही काही ना काही कारणाने संमेलनास अनुपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलन हे रसिक वाचक, श्रोते आणि साहित्यिक यांच्यात थेट संवाद होणारे एक हक्काचे व्यासपीठ असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलने राजकारणी किंवा त्यांच्या संस्थांच्या दावणीला बांधली गेली आहेत. साहित्यिकांपेक्षा राजकारणी मंडळी, मंत्री यांचेच वर्चस्व संमेलनावर दिसून येत आहे. कार्यक्रम व परिसंवादातील वक्ते म्हणून अपवाद सोडला तर मान्यवर व दिग्गज साहित्यिकांची अनुपस्थिती संमेलनातून जाणवत आहे.काही माजी संमेलनाध्यक्षांशी संपर्क साधला असता बहुतेक जणांनी काही ना काही कारणाने आपण संमेलनास जाणार नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी आपण संमेलनास जाणार असल्याचे सांगितले. डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले की, संमेलनाचे निमंत्रण आपणास आले आहे. मात्र वयोपरत्वे मी संमेलनास जाणार नाही. द. मा. मिरासदार यांनी सांगितले की, पूर्वनियोजनानुसार मी अन्य कार्यक्रम स्वीकारला असल्याने संमेलनास आपण उपस्थित राहणार नाही. प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष आणि प्रा. अरूण साधू या माजी संमेलनाध्यक्षानीही संमेलनास जाणार नसल्याचे सांगितले.
चिपळूणमध्ये बहुतांश माजी संमेलनाध्यक्षांची अनुपस्थिती
चिपळूण साहित्य संमेलनातील विविध परिसंवाद व कार्यक्रमात अपवाद वगळता मान्यवर व दिग्गज साहित्यिकांची अनुपस्थिती जाणवणार आहे. त्याचबरोबर आता काही माजी संमेलनाध्यक्षही काही ना काही कारणाने संमेलनास अनुपस्थित राहणार आहेत.
First published on: 10-01-2013 at 03:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former president of sahitya sammelan remain absent