मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व केलेल्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला. भाजपात माझी १० वर्षे वाया गेली. भाजप हा व्यापारी, धनाढ्यांचा आणि महिलांना महत्त्व न देणारा पक्ष बनला आहे, अशी टीका पाटील यांनी पक्षप्रवेशावेळी केली.

हेही वाचा >>> मुस्लीम समाजाचे सर्वेक्षण रखडले, अधिवेशनात मुद्दा पेटण्याची चिन्हे

‘मला लोकसभेची उमेदवारी देण्याचे भाजपने कबूल केले होते. २०१४ व २०१९ आणि २०२४ या तिन्ही लोकसभा निवडणुकांत मला डावलण्यात आले. दहा वर्षे भाजपात काही करू शकले नाही. राष्ट्रवादी सोडणे माझी घोडचूक होती. लोककल्याणापेक्षा भाजप नेतृत्व स्वकल्याणात हरवलेले आहे. वाजपेयी, अडवाणी, स्वराज यांचा भाजप आता राहिलेला नाही, अशी गंभीर टीका सूर्यकांता पाटील यांनी भाजपवर केली. निवडणुका लढवण्यासाठी मी राष्ट्रवादीत आलेली नाही. सांगेल ते पक्षात काम करेन. ‘तुम्ही वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा पक्षात घेतले आहे. त्याबद्दल धन्यवाद या शब्दात सूर्यकांता पाटील यांनी पवार यांचे आभार मानले.

राज्याचे सामाजिक चित्र अस्वस्थ करणारे आहे. इतर मागासवर्ग आणि मराठा समाजात जी दुही पडली आहे, ती योग्य नाही. सामाजिक ऐक्य साधण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचे कळले. यासंदर्भात आमचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा राहील. याप्रश्नी कोणी राजकारण करणार नाही, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. सूर्यकांता पाटील यांचे राजकारण विचारावर आधारीत आहे. त्या पक्षात परततील याची खात्री होती. सूर्यकांता परत आल्याने विधानसभेला मराठवाड्यातले चित्र बदलवण्यास मदत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.