‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ साठी ‘फोर्टिस’ रुग्णालयाचा पुढाकार

‘हृदय प्रत्यारोपण’ शस्त्रक्रियांसाठी ओळखले जात असलेल्या मुलुंड येथील ‘फोर्टिस’ रुग्णालयाने ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा,’ या मोहिमेत ‘प्लंबर आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. घराघरांमधून नादुरुस्त नळ व जोडण्यांमुळे वाया जात असलेले लाखो लिटर पाणी वाचविण्यासाठी दर रविवारी घरोघरी प्लंबर पाठवून ही गळती थांबविली जाणार आहे. ठाणे ते घाटकोपर परिसरातील गृहरचना सोसायटय़ांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी बचतीचे वेगवेगळे उपाय करून थेंब न थेंब पिण्यासाठी वापरता येऊ शकते. मुंबईत सुमारे ६५० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे ‘सीएसआर’ अंतर्गत पाणीबचतीसाठी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी ठाणे ते घाटकोपर परिसरातील सोसायटय़ांमध्ये प्लंबर आणि रुग्णालयाच्या स्वयंसेवक कर्मचाऱ्यांची पथके पाठविण्यात येत आहेत. दर रविवारी दिवसभर सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घरोघरी जाऊन गळके नळ व जोडण्या मोफत दुरुस्त करण्यात येत आहेत. ४५ सोसायटय़ांमध्ये जाऊन पाच हजाराहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. अनेक नळ व जोडण्या दुरुस्त करून किमान वार्षिक १२ लाख लाख लिटर पाण्याची गळती थांबविण्यात आली आहे. या उपक्रमासह अन्य उपक्रमांमुळे आतापर्यंत सुमारे २० हजार मुंबईकरांना लाभ झाला असून पुढील काही महिन्यात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे संचालक डॉ. एस. नारायणी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

रुग्णालयातील डॉ. आशुतोष पांडे यांच्याबरोबरच अनेक कर्मचारी स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली आहेत. विविध विभागातील सोसायटय़ांशी संपर्क साधून पदाधिकाऱ्यांबरोबर घरोघरी प्लंबरसह ही पथके जात आहेत. ठाणे ते घाटकोपर परिसरातील इच्छुक सोसायटय़ांनी ९१६७००११२२ या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती डॉ. नारायणी यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनाही पाणीबचतीचे महत्त्व पटवून देऊन त्यांनाही पाणी वाचविण्याच्या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मुंबईसह राज्यातील अन्य संस्थांनी अशी मोहीम राबविल्यास आणि सोसायटय़ांनी सहकार्य केल्यास लाखो लिटर वाया जाणारे पाणी पिण्यासाठी व अन्य कारणांसाठी वापरता येणार आहे. हाच या मोहिमेमागे उद्देश असून पुढील काही महिने पाणीबचतीसाठी जोमाने काम केले जाणार असून, गरजेनुसार अधिक पथके उपलब्ध करून दिली जातील, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

Story img Loader