लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसायात सहभागी चार नवोदित अभिनेत्रींची पोलिसांनी सुटका केली. तरूणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या ६० वर्षीय दलालाला पोलिसांनी अटक केली. या चारही तरूणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पवई येथे देहव्यापार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तोतया ग्राहकांद्वारे आरोपी दलालाशी संपर्क साधला. त्याच्याशी मोबाइलवरून बोलणे केले असता त्याने तरूणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीने चार तरूणींची छायाचित्रे व्हॉट्स ॲपवर पाठवली. तोतया ग्राहकाने आपल्या मित्रांनाही तेथे यायचे असल्यामुळे सर्व मुलींची आवश्यकता असल्याचे दलालाला सांगितले. त्यावेळी त्यांने चारही तरूणी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व मॉडेलिंग करणाऱ्या असून त्यांच्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये ते एक लाख रुपये मोजावे लागतील, असे दलालाने सांगितले.
तोतया ग्राहकाने थोडी तडजोड करून दलालाला रक्कम देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना पवईतील एका हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. तोतया ग्राहकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी गुरूवारी सदर हॉटेलबाहेर सापळा रचला होता. दलाल चार तरूणींना हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर चार महिला नोंदवलेल्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर तोतया ग्राहकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ तेथे छापा टाकून दलाल श्याम सुंदर अरोराला (६०) अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरूणींची सुटका करण्यात आली. त्या तरूणी २६ ते ३५ वर्ष वयोगटातील आहेत.
छाप्यादरम्यान पोलिसांनी हॉटेलच्या खोल्यांमधून ८ महागडे मोहाइल संच, रोख रक्कम जप्त केली. चार महिलांची चौकशी करण्यात आली. अरोरा ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी ५० टक्के रक्कम स्वतः घेत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही मोठी टोळी असून चारकोप परिसरात राहणारा एक व्यक्ती या टोळीत सहभागी असल्याचे अरोराच्या चौकशीतून निष्पन्न झाले.
“आम्ही या प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीचा शोध घेत आहोत. सुटका करण्यात आलेल्या तरूणींनी यापूर्वी काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्या मॉडेलिंग करतात. आम्ही अटक केलेल्या आरोपीची चौकशी करीत असून तो गेल्या अनेक वर्षांपासून देहव्यापारात गुंतला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून चार महिलांची सुटका करण्यात आल्याचे पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले. याप्रकरणी अरोराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या चार महिलांना देवनार महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.