मुंबई : पावसामुळे मुंबईतील सर्व वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. त्यात मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला मडगावला पोहचण्यास तब्बल ४.२८ तासांचा विलंब झाला. वेग आणि वक्तशीरपणा अशी ख्याती असलेल्या वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
उच्च मध्यमवर्गीय गटातील प्रवाशांना आरामदायी, वेगवान आणि वेळेत प्रवास वंदे भारतमधून होतो. त्यामुळे अनेक प्रवासी वंदे भारतचे तिकीट काढून प्रवास करतात. मात्र, सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने वंदे भारतचे चाक अडकवले. लोकल आणि रेल्वेगाड्या अवेळी धावत असताना, प्रीमियम रेल्वेगाड्यांनाही पावसाचा फटका बसला. सोमवारी सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ४७ मिनिटे उशिराने सीएसएमटी येथे पोहचली. सोमवारी सकाळी ६.०६ मिनिटांनी सोलापूरवरून वंदे भारत सुटली असता, कल्याणला नियोजित वेळेनुसार पोहोचली. मात्र, त्यानंतर वंदे भारत सीएसएमटीला दुपारी १२.३५ वाजेऐवजी दुपारी १.२२ वाजता पोहचली. त्यामुळे ४७ मिनिटांचा विलंब झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास २.२४ तास उशिरा झाला. या गाडीला सीएसएमटीवरूनच सुटण्यास १ तासाचा विलंब झाला. तर, ७ जुलै रोजी सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारतला ३.५० तासांचा विलंब झाला. तर, कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालवण्यात येत आहेत. मात्र तरीही नियोजित वेळापत्रकानुसार वंदे भारत धावत नसल्याचे निदर्शनास आले. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला ४.२८ तासांचा विलंब झाला. मडगावला दुपारी ३.३० वाजता वंदे भारत पोहचणे अपेक्षित असताना, वंदे भारत सायंकाळी ७.५८ वाजता पोहचली. तसेच मध्य रेल्वेवरील दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसला २ तासांहून अधिकचा उशीर झाला.
हेही वाचा >>>Mumbai Local Train Update : सीएसएमटी ते मानखुर्द लोकल ठप्प
एका तासात ५० उड्डाणे रद्द
मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानतेचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण सेवेला बसला. पाऊस पडल्यानंतर धावपट्टीचे कामकाज करण्यासाठी धावपट्टी एक तासाहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. रविवारी रात्रीपासून पाऊस पडत असल्याने, मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, सोमवारी दुपारनंतर पावसाने काहीही उसंत घेतली. त्यामुळे रात्री २.२२ ते रात्री ३.४० वाजपर्यंत धावपट्टीचे कामकाज करण्यात आले. त्यामुळे ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच सुमारे २७ उड्डाणे जवळच्या विमानतळावर वळवण्यात आली. तसेच काही उड्डाणे अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर यासारख्या शहरांकडे वळवण्यात आली.