महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर मंगळवारी केलेल्या कारवाईत अडीच कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक केली. आरोपींकडून चार किलो सोने जप्त करण्यात आले असून याप्रकरणामागे सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. इरफान शेख (४३), शबनम शेख (३८), मोहम्मद आरीफ (२६) व मोहम्मद अश्रफ (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंबई विमातळावर सौदी अरेबिया येथून येणारे दाम्पत्य सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ट्रॉम्बेमध्ये आठ बंदुका आणि पंधरा काडतुसासह दोघांना अटक

या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन चॅनल येथे दोघांनाही थांबवले. त्यावेळी तपासणीत इरफान व शबनम यांनी अंतर्वस्त्रात पाकिटे लपवली होती. त्यात सोन्याची भूकटी सापडली. त्यानंतर डीआरआयने त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यात मिक्सर सापडले. त्याचे वजन जास्त वाटल्यामुळे त्याचीही तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सोन्याची लगड सापडली.

हेही वाचा >>> एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या गळ्यावर ब्लेडने वार, तरूणी गंभीर जखमी

दोघांकडून मिळून ४००३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत दोन कोटी ५८ लाख ७९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना सौदी अरेबियातील जेद्दाह विमानतळावर एका व्यक्तीने सोने दिले होते. त्यांना ते मुंबई विमानतळावरील दोन व्यक्तींना द्यायचे होते. या माहितीनंतर डीआरआयने विमानतळावर शोध मोहीम राबवून आरिफ व अश्रफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान व शबनम दोघेही पती-पत्नी असून पैशांसाठी ते या तस्करीत सहभागी झाले होते. या तस्करीमागे मोठी टोळी असल्याचा संशय असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four arrested at mumbai airport for smuggling gold worth rs 2 5 crore from saudi arabia mumbai print news zws