मुंबईः तरुणाचे अपहण करून पाच लाख रुपयांची खंडणी उकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. आरोपींनी एका डेटिंग ॲपद्वारे तक्रारदार तरुणाशी संपर्क साधला व उच्चभ्रू महिलांसोबत मैत्री करण्यासाठी १० हजार रुपये देण्याचे आमीष दाखवून भेटण्यास बोलवले होते. यातील मुख्य आरोपी नर्तक असून तो टीव्हीवरील प्रसिद्ध नृत्य स्पर्धेत सहभागी झाला होता. आरोपीविरोधात अपहरण व खंडणीचे गुन्हे आहेत.
२४ वर्षीय तक्रारदाराचा खोट्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. त्याने डेटिंग ॲपवर स्वतःचा मोबाइल क्रमांक दिला होता. त्याच्या सहाय्याने आरोपींनी त्याला संपर्क साधला. आरोपी महिला डेटिंगचे काम करतात व त्यांना महिलांसोबत मैत्री करण्यासाठी २० हजार रुपये मिळतात, त्यातील १० हजार रुपये तक्रारदार तरुणाला दिले जातील, असे आरोपींनी सांगितले होते. त्याला होकार दिल्यानंतर तक्रारदार तरुणाला आरोपींनी १० ऑगस्टला रात्री ११ वाजता अंधेरी (पश्चिम) येथील इन्फिनिटी मॉलजवळ भेटण्यासाठी बोलावले. मोटरगाडीतून ग्राहक महिला घरी घेऊन जातील, असेही त्याला सांगण्यात आले होते. मोटरगाडीमध्ये बसल्यानंतर तात्काळ आरोपींनी त्याला पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि पाच लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तक्रारदाराकडून ऑनलाइन व्यवहार करून दोन हजार रुपये आणि रोख पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित रक्कम नंतर देण्याच्या अटीवर त्यांनी त्याला जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा नोंदवला.
हेही वाचा >>> मुंबई : परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
आम्ही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले आणि गुन्ह्यात वापरलेले वाहनाची माहिती मिळाली. त्यामुळे आम्हाला या प्रकरणाचा छडा लावण्यात मदत झाली, असे ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनवडे यांनी सांगितले. याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहितकुमार टाक उर्फ प्रशांत डान्सर उर्फ बेबो व्यवसायाने नर्तक असून तो गोरेगावमधील बांगूर नगरमध्ये राहतो. तो मूळचा राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी आहे. याप्रकरणातील दुसरा आरोपी वझुल खान (३५) हा खासगी टॅक्सी चालक आहे. खान हा मालवणीतील रहिवासी आहे आणि त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही. तिसरा आरोपी कैफ अन्सारी (२०) याला बुधवारी अटक करण्यात आली. गुन्ह्या घडला तेव्हा तो मोटरगाडीत उपस्थित होता. तक्रारदाराने त्यालाच खंडणीची रक्कम पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खंडणी, डांबून ठेवणे, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी टाक याच्यावर अपहरणाचे दोन गुन्हे आणि खंडणीचे तीन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.