मुंबई : घाटकोपर, अंधेरी व गोरेगाव परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पूर्व येथे पूर्ववैमनस्यातून एका माथेफिरूने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर व लायटर हातात घेऊन सर्व रहिवाशांना जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आरोपीने काठीने मारहाण केली. अर्धातास चाललेल्या या थरारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याशिवाय गोरेगाव येथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनी पोलिसांवर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. तर अंधेरी येथे एका पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली.
हेही वाचा >>> Viral Video : मुंबईत एमआयएम समर्थकांची वृद्ध साधूला मारहाण? पोलीस म्हणाले…
घाटकोपर पूर्व परिसरातील भीमशक्ती रहिवासी संघ येथील काही रहिवाशांबरोबर आरोपी विनोद शर्माचे पूर्वीपासून वाद होते. त्यामुळे विनोदने नागरिकांना शिवीगाळ कली आणि त्यांना धमकावण्यासाठी घरातून सिलिंडर व लायटर घेऊन आला. विनोदने लायटर पेटवला आणि तेथील रहिवाशांना जाळून ठार मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पंतनगर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विनोदला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विनोदला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. त्याने पोलीस हवालदार बाळकृष्ण काकड यांना धक्का मारून खाली पाडले व काठीने मारहाण केली. इतर पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर गुरूवारी विनोदविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तात्काळ त्याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात मारहाणीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन गुन्हे पंतनगर पोलीस ठाणे, तर पार्कसाईट पोलीस ठाणे व टिळक नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा >>> धक्कादायक! मुंबईत भटक्या श्वानावर अॅसिड हल्ला, सीसीटीव्हीत कैद झाले मन हेलावणारे दृश्य!
दुसऱ्या घटनेत अंधेरी पश्चिम येथेही दोघांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई बाळू पवार यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी इकबाल पटेल, हॅपीकुमार सिंह व मोहम्मद पटेल या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. तिसऱ्या घटनेत गोरेगाव पश्चिम येथेही पोलीस पथकावर पेव्हर बॉकने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. परिसरात काही व्यक्ती मद्यप्राशन करून गोंधळ घालत होते. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी पेव्हर ब्लॉक फेकले. तसेच एका पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी बांगुर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.