लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेल्या कारवाईत सुमारे ११ किलो कोकेन, ४.९ किलो गांजा, कॅनॅबिस गमीजची २०० पाकिटे जप्त केली. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून ही टोळी संपूर्ण देशभरात अमली पदार्थांचे वितरण करीत होती. विशेष करून या टोळीचे मुंबईत मोठे जाळे पसरले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एनसीबीने जानेवारी २०२५ मध्ये २०० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. या प्रकरणात मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने नुकतीच नवी मुंबई येथे कारवाई करून ११ किलो ५४० ग्रॅम उच्च दर्जाचे कोकेन, ४ किलो ९०० ग्रॅम गांजा, २०० पाकिटे (५.५ किलोग्रॅम) कॅनॅबिस गमीज आणि एक लाख ६० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीमधून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणाऱ्या एका पार्सलमधून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
एनसीबीच्या मुंबई कक्षाला तपासादरम्यान याप्रकरणात मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली. ही टोळी भारतातून परदेशा मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करीत असत्याचे एनसीबीला समजले. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले अमली पदार्थ आरोपींनी अमेरिकेतून मुंबईला आणले होते. नंतर ते कुरिअर / लहान मालवाहतूक सेवांद्वारे, तसेच मानवी वाहकांच्या (ह्यूमन कॅरिअर्स) मदतीने भारत आणि परदेशातील विविध ग्राहकांना पाठवले जाणार होते. आरोपींना एकमेकांची माहिती नव्हती. खोटी नावे वापरून या टोळीतील सदस्य अमली पदार्थांची देवाण घेवाण करीत होते. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, टोळीत सहभागी अन्य तस्करांची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.