हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड भरलेला एक बुधला टेम्पोतून उतरवताना हातातून सटकल्याने हे अ‍ॅसिड अंगावर पडून चार मुले भाजल्याची घटना गुरुवारी कांदिवली येथे घडली. कांदिवली लिंक रोड येथील लालजीपाडा या औद्योगिक पट्टय़ात ही चार मुले सकाळई खेळत होती, त्या वेळी ही घटना घडली. या चारही मुलांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती ६ ते २० टक्के भाजली आहेत.
राजकुमार पासवान, राधिका पासवान, फजल खान आणि फैजल खान ही चार मुले गुरुवारी सकाळी लालजीपाडा येथे खेळत होती. हा सगळा औद्योगिक पट्टा असल्याने तेथे नेहमीच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या भागात बाळू चव्हाण यांची प्लेटिंगची कार्यशाळा आहे. तेथे हे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड मागवण्यात आले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास एका टेम्पोतून हे अ‍ॅसिड आणण्यात आले. मात्र टेम्पोचालक आपल्या मदतनीसाच्या मदतीने अ‍ॅसिडचा बुधला कार्यशाळेत नेत असताना त्यांच्या हातातून तो सटकला आणि जवळच खेळणाऱ्या या चार मुलांच्या पायावर अ‍ॅसिडचे काही थेंब उडाले. या अ‍ॅसिडमुळे या चौघांचेही पाय भाजले. घटनेनंतर टेम्पोचालक येथून फरार झाला.

Story img Loader