मनसेसाठी मुंबई महापालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण असतानाही पक्षाचा दबदबा निर्माण करणाऱ्या संदीप देशपांडे, चेतन कदम, सुधीर जाधव आणि दिलीप कदम यांची स्थायी समिती, सुधार समिती आणि बेस्ट समितीमधून पद्धतशीर उचलबांगडी करण्यात आली. पक्षातील ‘सरदेसाईगिरी’चा फटका या नगरसेवकांना बसल्याचे बोलले जात असून प्रामाणिक कामगिरीचे ‘असे’ बक्षिस मिळणार असेल तर यापुढे केवळ ‘अर्थपूर्ण’ कामेच करायची का असा सवाल या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना या बदलाची कल्पना तरी आहे का, याबद्दलही पक्षात शंका व्यक्त होत आहे.
महापालिका सभागृह अथवा विविध समित्यांचे कामकाज समजून घेऊन ठसा उमटविण्यास किमान तीन ते पाच वर्षे लागतात. अनेक नगरसेवकांना दहा वर्षांनंतरही जे साध्य होऊ शकत नाही ती कामगिरी स्थायी समितीत संदीप देशपांडे व चेतन कदम यांनी करून दाखवली.
२५० कोटी रुपयांच्या शालोपयोगी वस्तू खरेदीतील घोटाळा, ५५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांतील घोटाळ्यासह अनेक तांत्रिक व कायदेशीर मुद्दे उपस्थित करून या जोडगोळीने मनसेचा दबदबा निर्माण केला. राज ठाकरे यांची रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना पाठपुरावा करून ती पूर्णत्वाला नेण्यासाठी संदीप देशपांडे यांनी पाठपुरावा केला, तर सुधार समितीत सुधीर जाधव यांनी मंडयांच्या धोरणासह शहराच्या विकासाच्या प्रस्तावांवर प्रश्न उपस्थित करून आपला ठसा उमटवला. केंद्र शासनातील नोकरी सोडून बेस्ट सदस्यत्व स्वीकारलेल्या दिलीप कदम यांच्या मुद्दय़ांना बेस्टच्या महाव्यवस्थापकांनीच नव्हे तर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही दाद दिली.
मात्र पक्षातीलच शकुनी‘मामा’मुळे या नगरसेवकांना संबंधित समितीचे सदस्यत्व अवघ्या वर्षांतच गमवावे लागणार आहे. संदीप देशपांडे यांच्या कामगिरीमुळे आपली पदे धोक्यात येतील अशा भीतीमुळे त्यांची ‘विकेट’ काढल्याची चर्चा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत असून यामागे सरदेसाईचा हात असल्याचेही बोलले जात आहे. बेस्ट समितीत मनसेच्या केदार उंबाळकर व दिलीप कदम यांची जमलेली जोडी पद्धतशीरपणे फोडण्यात आली आहे. शिवसेनेला या नगरसेवकांमुळे अनेकदा अडचणीत यावे लागत असल्यामुळे मनसेतील ‘सरदेसाईगिरी’च्या सहाय्याने ही उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा मनसेच्या नगरसेवकांमध्ये होताना दिसते.
मनसेतील अंतर्गत वादाचा चार नगरसेवकांना फटका
मनसेसाठी मुंबई महापालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण असतानाही पक्षाचा दबदबा निर्माण करणाऱ्या संदीप देशपांडे, चेतन कदम, सुधीर जाधव आणि दिलीप कदम यांची स्थायी समिती, सुधार समिती आणि बेस्ट समितीमधून पद्धतशीर उचलबांगडी करण्यात आली.
First published on: 24-03-2013 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four corporator got hited by internal debate in mns