माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने निकषात न बसणाऱ्या चार अपात्र उमेदवारांची जिल्हा माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करतांना राबविलेली भरती प्रक्रीयाच सदोष असल्याचा निर्वाळा देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने(मॅट)  ही प्रक्रीयाच बेकायदा ठरवून रद्द केली होती. त्यावर ऑक्टोबपर्यंत कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी देत किरण मोघे, मीनल जोगळेकर, वर्षां आंधळे व कीर्ती मोहरील या चार अधिकाऱ्यांना दिलासा दिला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जिल्हा माहिती अधिकारी पदासाठी सन २००८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. भरती प्रक्रीयेतून किरण मोघे, मीनल जोगळेकर, वर्षां आंधळे व कीर्ती मोहरील यांची निवड झाली. मात्र त्यावेळी आणखी एक उमेदवार संजय भोकरडोळे यांना लेखी परीक्षेला अपात्र ठरविण्यात आले. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर भोकरडोळे यांनाही परिक्षेला बसू देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली मात्र त्याचा निकाल जाहीर न करताच अन्य चार उमेदवांची निवड केली.  त्यावर भरती प्रक्रियेसाठी आपण पात्र असूनही डावलल्याचा आरोप करीत भोकरडोळे यांनी या भरती प्रक्रीयेलाच मॅटमध्ये आव्हान दिले होते.

Story img Loader