मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या चार परदेशी महिलांना अटक करण्यात आली. आरोपी महिलांकडून सव्वापाच किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपी महिलांविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केनियातून सोने तस्करी करणारी टोळी भारतात मोठ्या प्रमाणात सोने पाठवणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे केनियातील नैरोबी येथून विमानाने मुंबईत आलेल्या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्या चारही महिला केनियामधील नागरिक आहेत. डीआरआयच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांनी परिधान केलेल्या बुरखा व कपड्यांमध्ये सोने सापडले. चारही महिलांकडे एकूण ५१८५ ग्रॅम सोने सापडले. ते सोने जप्त करण्यात आल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत चार कोटी १४ लाख रुपये आहे. चारही महिलांची चौकशी केली असता त्यांनी सोने तस्करीत सक्रिय असल्याचे मान्य केले. त्यानंतर त्या चौघींनाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात केनियातील टोळी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलांना मुंबई विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर एका व्यक्तीला सोने देणार होत्या. ती व्यक्ती त्यांना भेटणार होती. त्याबाबत त्यांनाही काही रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यापूर्वीच त्यांना अटक झाली. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करीत आहे.