मुंबई : पुनर्विकासावरून धारावीत राजकीय मतमतांतरे समोर आली असतानाच काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यामागे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व स्थानिक आमदार वर्षां गायकवाड यांच्या विरोधातील नाराजी की धारावी पुनर्विकासाची किनार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
वास्तविक धारावीत शिंदे गटाचे फारसे अस्तित्व नाही. तरीही काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरल्याबद्दल धारावीतच आश्चर्य व्यक्त केले जाते. धारावीच्या पुनर्विकासाचे काम सुरू होणार आहे. पुनर्विकासावरून धारावीत सध्या नागरिकांमध्ये संभ्रम आहे. स्थानिकांना बाहेर हुसकावून पुनर्विकास केला जाईल, अशी लोकांमध्ये भीती आहे. अर्थात, सरकारने कोणालाही येथून हटविले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>मुंबई : हार्बर मार्गावरील जुईनगर येथे ४ स्टेबलिंग साइडिंग्सची उभारणी
वर्षां गायकवाड यांची अलीकडेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून मुंबई काँग्रेसमधील जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा वाद सुरू आहे. त्यातच त्यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने आगामी निवडणुकीत गायकवाड यांच्यासाठी आव्हान असेल. एकीकडे पक्षांतर्गत वाद तर दुसरीकडे मतदारसंघातील आव्हान अशा दुहेरी आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा >>>‘इंडिया’च्या मानचिन्हाचे गुरुवारी अनावरण; दोन दिवसांच्या बैठकीत समन्वयावर चर्चा
धारावी पुनर्विकासात कोणाचाही अडसर असू नये, असे सध्या प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या पक्षांतराला पुनर्विकास प्रकल्पाची किनार असल्याची चर्चा रंगली आहे. अल्पसंख्याकबहुल प्रभागातून निवडून आलेल्या माजी नगरसेवकाने भाजपच्या महायुतीत सहभागी असलेल्या शिंदे गटात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. वर्षां गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल जरूर नाराजी आहे; पण चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला यामागे नक्कीच अर्थकारण असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जाते. धारावी पुनर्विकास मार्गी लागावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सारेच सत्ताधारी प्रयत्नशील आहेत.