महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील माजी आमदार प्रवीण दरेकर, नाशिकचे वसंत गीते, कल्याण(ग्रामीण) चे रमेश पाटील आणि ईगतपुरीचे काशीनाथ मेंगळ यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपाध्यक्ष अॅड. आशिष शेलार उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून पक्षातील नेते अस्वस्थ होते आणि भाजप किंवा शिवसेनेत प्रवेशासाठी धडपडत होते. प्रवीण दरेकर यांनी भाजप व शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करुन गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यानंतर अखेर या नेत्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला. दरेकर यांच्यावर मुंबई बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तरीही त्यांना भाजपमध्ये प्रवेश कसा देण्यात आला, असे विचारता त्यांच्यावरील आरोप अजून सिध्द झालेले नाहीत. ते जेव्हा सिध्द होतील, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे दानवे यांनी सांगितले.
कोणतीही अपेक्षा ठेवून या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आणि त्यांना कोणतीही आश्वासने देण्यात आलेली नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी १२ जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी आमदारांच्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा