मुंबई : धावत्या गाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटेच्या सुमारास जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली. चेतन सिंह असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोळीबारात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मदल हुसैन भानपूरवाला (४८), असगर अब्बास अली (४८) यांच्यासह अजून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत चौथ्या प्रवाशाची ओळख पटली नव्हती. अब्दुल हे नालासोपारा येथील रहिवासी असून असगर शिवडीमध्ये भावासह राहात होते. आरोपीविरोधात हत्या व हत्यार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे हत्यार जप्त करण्यात आले आहे.

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये सकाळी साडेपाचच्या सुमारास चेतन सिंहने सर्वप्रथम बी ५ टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. त्या डब्यात आणखी एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याने खानपान सेवेच्या डब्यात एकाला गोळी मारली व नंतर एस ६ डब्यामध्ये आणखी एकाची हत्या केली. आरोपीने एकूण १२ गोळय़ा झाडल्या. त्यानंतर गाडीची आपत्कालिन साखळी ओढली. मिरा रोड स्थानकात गाडी थांबल्यानंतर आरोपीने पळ काढला. पाठलाग करणाऱ्या आरपीएफ जवानांनाही त्याने मारण्याची धमकी दिली. रुळांवरून पळत असताना मिरा रोडच्या रेल्वे पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याच्याकडील रायफल ताब्यात घेतल्यानंतर त्याची बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. दरम्यान, चारही मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चेतन हा मुळचा उत्तर प्रदेशातील हाथरसचा आहे. यापूर्वी तो गुजरातमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याची मुंबईत बदली झाली होती. तो २००९ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर तो आरपीएफमध्ये लागला होता. सध्या तो लोअर परळ आरपीएफ कार्यालयात तैनात होता.  तर तर मृत टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये कार्यरत होते. मूळचे राजस्थानमधील असलेले टिकाराम दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांची मुलगी पतीसह कल्याण येथे राहते. त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने आरपीएफकडून सर्व प्रक्रिया सुरूवात करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नालासोपारा येथील रहिवासी असलेले भानपूरवाला हे लहान मुलांच्या वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांची पत्नी व मुलगी दुबईमध्ये राहते. भानपूरवाला मोहर्रमसाठी मध्य प्रदेशात गेले होते. तेथून परतत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर अली अब्बास हे बांगडी विक्रेता होते. मूळचे राजस्थान येथील रहिवासी असलेल्या अब्बास यांचा जयपूरला बांगडय़ांचा कारखाना आहे. त्यांचे भाऊ मुंबईत राहतात. कामासाठी ते त्यांच्याकडे येत होते.

आरोपीची चित्रफित उजेडात

आरोपीची एक चित्रफित समोर आली असून यात हत्या केलेल्यांच्या मृतदेहांसमोर उभे राहून तो काही विधाने करीत आहे. ‘‘यांनी मारले.. पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात होते आणि माध्यमांतून हेच दाखवले जात होते.. त्यांना कसे कळाले, त्यांचे म्होरके तिथे बसलेत. हिंदूस्तानात रहायचे असेल, तर मी सांगतोय, मोदी व योगी हे दोघे आहेत.. आणि तुमचे ठाकरे..’’ असे तो बडबडत आहे. याबाबत विचारले असता सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त रिवद्र शिसवे यांनी सांगितले. तपासाअंतीच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचणे उचीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four killed by rpf jawans in train jaipur mumbai express accused arrested ysh