विनायक डिगे: लोकसत्ता
मुंबई: जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसाठी लवकरच चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. इमर्जन्सी मेडिसिन, इंटरव्हेशन रेडिओलॉजी, जेरिॲट्रिक आणि इम्युनो हिमेटोलॉजी ॲण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन हे चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यातील इमर्जन्सी मेडिसिन या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून, अन्य अभ्यासक्रमांचे सर्वेक्षण झाले आहे. लवकरच त्यांनाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्य मिळावे या अनुषंगाने या वर्षापासून चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. हे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातील इमर्जन्सी मेडिसिन या अभ्यासक्रमाच्या पाच जागांना आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
हेही वाचा… शरद पवारांच्या नावाने घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी मारली टपली; म्हणाले, “आरे…!”
त्याचप्रमाणे इंटरव्हेशन रेडिओलॉजी, जेरिॲट्रिक या अभ्यासक्रमाची आयोगाकडून तपासणी करण्यात आली असून, यासंदर्भात लवकरच मान्यताही मिळण्याची शक्यता आहे. तसेच रक्त संक्रमणासंदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या इम्युनो हिमेटोलॉजी ॲण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन या अभ्यासक्रमासंदर्भात आयोगाकडून या आठवड्यात तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंटरव्हेशन रेडिओलॉजी, जेरिॲट्रिक आणि इम्युनो हिमेटोलॉजी ॲण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन या तिन्ही अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्यास नव्या शैक्षणिक वर्षापासून हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
हेही वाचा… “सुप्रिया, तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, अजित पवारांनी रोखलं; नेमकं काय घडलं?
अपघात विभागात रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार
इमर्जन्सी मेडिसिन हा अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच याचा स्वतंत्र विभागही स्थापन करण्यात येणार आहे. जेणेकरून रुग्णालयामध्ये अपघात विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची तातडीने तपासणी करून त्यांच्यावरील अद्ययावत उपचाराची दिशा ठरविण्यात येणार आहे. हा विभाग २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याने रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.