लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई विद्यापीठामध्ये १९६३ साली संस्कृत विभागाची स्थापना करण्यात आली असून यंदा संस्कृत विभागाला ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून प्रथमच एम.ए योगशास्त्र, एम.ए अर्थशास्त्र, एम.ए आर्ष महाकाव्य – पुराणे आणि एम.ए अभिजात संस्कृत साहित्य हे दोन वर्षीय चार पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि भगवद्‌गीताविषयक एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. याचसोबत ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली’वर आधारित ६० व्याख्यानांची मालिकाही आयोजित करण्यात येणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चालविण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना ‘एम.ए योगशास्त्र’ या अभ्यासक्रमामध्ये संस्कृतभाषेत असणारे योगविषयक ग्रंथांचे प्रात्यक्षिकासह अध्यापन केले जाईल. योगशिक्षक, योगाभ्यासक या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारा आहे. ‘एम्.ए आर्ष महाकाव्ये आणि पुराणे’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रामायण-महाभारत व पुराणांचे विविधांगी दृष्टीकोनांतून चिकित्सक अध्ययन करण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन विद्यार्थी भविष्यात चित्रपट व मालिकांच्या निर्मितीसंस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून रुजू होऊ शकतात.

हेही वाचा… “समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…”, बस अपघातातील २५ मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

‘एम्.ए अर्थशास्त्र’ हा अभ्यासक्रम कौटिल्य अर्थशास्त्र व तत्सम ग्रंथ यावर आधारीत असून चाणक्यनीतिचा अवलंब विद्यार्थी विविध पातळ्यांवर करू शकतील. तर ‘एम्.ए अभिजात संस्कृत साहित्य’ या अभ्यासक्रमातून संस्कृतभाषेमध्ये असलेल्या प्रचुर वाङ् मयाची ओळख व रसास्वाद घेण्यात येणार आहे. तर भगवद्‌गीताविषयक पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भगवद्‌गीतेचे निरनिराळे अर्थ आणि विविधांगी दृष्टिकोनांतून विवेचन तसेच विश्लेषण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे मूलभूत ज्ञान प्राप्त होण्यासाठी या अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत भाषाविषयक आणि संस्कृत व्याकरणविषयक घटक अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा… VIDEO: गोष्ट मुंबईची – गौतम बुद्धांच्या चरणस्पर्शाने ‘हे’ ठिकाण पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा!

पात्रतेचे निकष

एम.ए योगशास्त्र, एम.ए अर्थशास्त्र, एम.ए आर्ष महाकाव्य – पुराणे आणि एम.ए अभिजात संस्कृत साहित्य या चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. सदर चारही अभ्यासक्रमांसाठी येत्या ७ जुलै २०२३ रोजी २०० गुणांची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. तर भगवद्‌गीताविषयक एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. तर ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली’वर आधारित ६० व्याख्यानांची मालिका सर्वांसाठी खुली असेल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी http://www.sanskritbhavan.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

‘संस्कृत ही ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. सदर अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये कोणकोणत्या ज्ञानशाखा अस्तित्वात होत्या, याची सर्वांगीण ओळख होईल. समाजाला जागृत करणारे हे अभ्यासक्रम आहेत आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सदर विषयांमधील तज्ञही तयार होतील. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राचीन भारतीय प्रणालीला महत्त्व देण्यात आल्यामुळे, हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत’. – डॉ. शकुंतला गावडे, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागप्रमुख

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four new postgraduate courses in the mumbai university sanskrit department mumbai print news dvr