मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृहविभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर महामुंबईत प्रथमच नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची निर्मीत होणार आहे. याशिवाय या पोलीस ठाण्यांसाठी लागणाऱ्या अतिरिक्त संख्याबळाकरीता २७९ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई महानगराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना १९९९ पासून लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे चार हजार अधिकारी – पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव रेल्वे पोलिसांनी गृहविभागाला पाठवला होता. रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलेल्या पाठवपुराव्यानंतर अखेर गृहविभागाने चार पोलीस ठाणी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरू दिली.
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकानंतर थेट कसारा रेल्वे पोलीस ठाणे आहे. या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांमधील अंतर ६७ किलोमीटर असून त्यादरम्यान सुमारे १२ स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे कर्जत मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आहे. त्या दोन स्थानकांमधील अंतर सुमारे ४६ किलोमीटर आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनवर प्रमुख एक्स्प्रेस आणि लोकल थांबतात. शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, खर्डी येथे मोठया संख्येने वसाहती आहेत. तेथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहाड ते खर्डीदरम्यान काही घटना घडल्यास तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागते. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, नेरळ, भिवपुरी येथे लोकवस्ती वाढत असून तेथून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत येतात.
पश्चिम मार्गावरील प्रवशांची संख्या वाढत असल्यामुळे बोरिवली व वसई दरम्यानही एका रेल्वे स्थानकाची आवश्यकता होती. बोरिवली रेल्वेची हद्द जोगेश्वरी – दहिसर, वसई रेल्वे पोलिसांची हद्द मीरा रोड – विरारपर्यंत आहे. भाईंदर येथील नवीन पोलीस ठाण्यामुळे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार हलका होणार आहे. तसेच मुंबईतील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथून दररोज सुमारे ६० लांबपल्ल्याच्या रेल्वे सुटतात. एलटीटीमध्ये सध्या दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी येतात. एलटीटी स्थानक सध्या कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. पण कुर्ला रेल्वे पोलिसांची हद्द व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एलटीटीमध्येही स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे आवश्यक होते. या पोलीस ठाण्याअंतर्गत गोवंडी, मानखुर्द आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते गोरेगाव स्थानकांचा समावेश करता येईल. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलिसांचा बराचसा भार हलका होईल. या चार पोलीस ठाण्यासाठी २७९ नवीन पदे निर्माण करणासाठी २५ कोटी एवढ्या आवर्ती खर्चाला व एक कोटी २१ लाख अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.