मुंबई: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खासगी गरब्याच्या बनावट प्रवेशिकांची विक्री करून आयोजकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना १२ तासात अटक करण्यात आली असून त्यांच्या दोन पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. वेब मालिका पाहून ही युक्ती सुचल्याचे मुख्य आरोपीने चौकशीत सांगितले आहे.
दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरिवली आणि स्थानिक आमदार प्रस्तुत रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन २ विथ कींजल दवे या कार्यक्रमाचे आयोजन १५ ऑक्टोबर पासून करण्यात आले. त्याच्या प्रवेशिकांची विक्री बोरिवलीतील कच्छी मैदान या ठिकाणावर असलेल्या एकाच स्टॉल वरून तसेच ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे करण्यात येत आहे.
हेही वाचा… मुंबई: डोक्यात लोखंडी सळी मारून २४ वर्षीय तरूणाची हत्या; आरोपीला अटक
मात्र काही तरुणांनी त्यांना मिळालेल्या प्रवेशिका बनावट असल्याची तक्रार आयोजक नीरव मेहता (३२) यांच्याकडे १४ ऑक्टोबर रोजी केली. महाविद्यालयातील मित्र करण शहा याने दर्शन गोहिल नावाच्या व्यक्तीकडून घेऊन प्रत्येकी ३ हजार रुपये याप्रमाणे १० प्रवेशिका विकल्याचे उघड झाले. त्यानुसार एमएचबी कॉलनी पोलिसांत आयोजकांनी धाव घेतली. गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शाह (२९ ), दर्शन गोहिल (२४ ), परेश नेवरेकर (३५) तसेच कवीश पाटील (२४) यांना अटक केली. विरार, कांदिवली, मालाड मधून मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना पोलिसांनी शोधून काढले.
हेही वाचा… पंतप्रधान आवास योजना गोरेगाव पहाडीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात
आरोपीकडून पोलिसांनी ३० लाख रुपयांच्या बनावट प्रवेशिका, होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप, प्रिंटर व इतर साधन सामुग्री मिळून ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी करण शहा हा ग्राफिक डिझायनर असून त्याने एका वेब मालिकेतील प्रसंगांवरून हा गुन्हा केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.