मुंबई : दोन वर्षांपूर्वी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या चार महिलांना अलिकडेच वांद्रे येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. झीनत हाफिज मंसुरी, शाहिन जहीर शेख, रिझवाना ऊर्फ रुक्साना दिलावर खान आणि फौजिया हमीद अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केली. पोलिसांवर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करून एका आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा या चौघींवर आरोप आहे.
दोन वर्षांपूर्वी वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने हाफिज मंसुरी या संशयित आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हाफिजला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एका महिलेने चक्कर आल्याचा बहाणा करून हाफिजला पळून जाण्यास मदत केली होती. या संपूर्ण घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी हाफिजसह चारही महिलांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच चारही महिला पळून गेल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पोलीस शोध घेत होते. ही शोध मोहीम सुरू असतानाच या चारही महिला पुन्हा वांद्रे परिसरात वास्तव्यास आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवून झीनत मंसुरी, शाहिन शेख, रिझवाना खान आणि फौजिया अन्सारी या चौघींना अटक केली. दोन वर्षांपासून त्या पोलिसांना चकवा देत होत्या. अखेर वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केली.