लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नागपाडा येथील डिमटीमकर मार्गावरील बिस्मिल्ला स्पेस या इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी काही कामगार रविवारी साडेबाराच्या सुमारास टाकीत उतरले असता गुदमरल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला तर एका कामगारावर उपचार सुरू आहेत.

बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीतील तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीची अनेक महिन्यांपासून स्वच्छता झाली नव्हती. त्यामुळे टाकी स्वच्छ करण्याचे कंत्राट सोसायटीने एका खाजगी कंपनीला दिले. त्या कंपनीचे कामगार टाकी स्वच्छ करण्यासाठी रविवारी दुपारी खोल टाकीत उतरले. मात्र, टाकीतील अपुऱ्या प्राणवायूमुळे काहीवेळातच त्यांचा श्वास गुदमरला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. त्याचबरोबर, रुग्णवाहिका, पोलीस आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही दुर्घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच कामगारांना बाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या जे. जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. हसीबुल शेख (वय १९), राजा शेख (वय २०), जिउल्ला शेख (वय ३६), इमांदू शेख (वय ३८) अशी मृत कामगारांची नावे आहेत. त्यातील पुरहान शेख (वय ३१) हा वाचला असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader