मुंबई : कांदिवलीत ४ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मृत मुलाच्या सावत्र वडिलांचा मित्र आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे त्याची ओळख पटली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
एक संशयित सायकलवरून २२ मार्च रोजी आला आणि झोपलेल्या बालकाचे अपहरण केले. त्यानंतर निर्दयपणे त्याची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळी परत आला आणि मुलाचा मृतदेह कुटुंबीय झोपलेल्या ठिकाणापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर टाकून पळून गेला. सुरूवातीला मुलाचे कपडे भिजले असल्यामुळे त्याचा पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पण मुलाच्या गळ्यावर व्रण असल्यामुळे त्याचा गळा आवळून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले.
अक्षय गरूड असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने मुलाचे अपहरण व हत्या का केली, याचे नेमके कारण सांगितलेले नाही. त्याबाबत त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित कैद पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली. मृत मुलगा कांदिवली पूर्व येथील आपल्या पालकांसोबत राहत होता. घटनेच्या एक दिवस आधी तो आपल्या आजीला भेटण्यासाठी कांदिवली पश्चिम, इराणीवाडी येथे आला होता.
त्याची आजी पदपथावर राहात असून अपहरणाच्या वेळी तीही त्याच्यासह होती. रात्री २ वाजण्याच्या सुमारास, आरोपी सायकलवरून आला आणि झोपलेल्या मुलाला उचलून घेऊन गेला. सुमारे अर्ध्या तासाने आरोपीने मुलाचा मृतदेह एका बांधकामाच्या ठिकाणी टाकला आणि तो फरार झाला. आरोपी मृत मुलाच्या सावत्र वडिलांचा मित्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले.