लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी त्या ओळखून देशासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास विकसित भारताचे उद्दिष्ट्य २०४७ च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी केले. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षान्त समारंभ हा राज्यपालांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत पी.एचडी, विविध विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १ हजार १८६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तर ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या चौथ्या वार्षिक दीक्षान्त समारंभास नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दीक्षान्त भाषण केले. डॉ. भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी, मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर निश्चित असे ध्येय ठेवावे व ते गाठण्यासाठी आपल्या गतीने सातत्याने काम करावे. जीवनात शिस्त व नीतिमूल्ये पाळल्यास कोणतीही शक्ती तुम्हाला रोखु शकणार नाही. आपण विद्यार्थी असताना टेबल टेनिस व मैदानी खेळात नियमितपणे सहभागी व्हायचो. त्यामुळे आज ६८ व्या वर्षी आपले आरोग्य उत्तम असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांचे वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून प्रत्येक विद्यापीठाने आपला वार्षिक दीक्षांत समारोह शेवटची परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात आयोजित करण्याच्या सूचना दिल्याची माहिती राज्यपालांनी दिली.

सिडनहॅम महाविद्यालयातून १९२५ साली वाणिज्य शाखेतून पदवी संपादन करून आशियातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर ठरलेल्या आणि त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला कर्मचारी झालेल्या यास्मिन खुर्शेजी सर्व्हेयर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात विशेष स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाअंतर्गत वाणिज्य शाखेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.