पश्चिम रेल्वेनं आपल्या चतुर्थ श्रेणीच्या कामगारांना विदेशवारीचे गिफ्ट गिले आहे. चुतुर्थ श्रेणीच्या ५२ कर्मचाऱ्यांना रेल्वेने पर्यटनासाठी थायलँडमध्ये पाठवलं आहे. पाच दिवसांच्या ट्रिपचा ६७ टक्के खर्च रेल्वेने उचलला आहे. शनिवारी रेल्वे कर्मचारी थायलँडसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. ५२ जणांच्या या पथकात २० महिला, २८ पुरुष कर्मचारी आणि ४ टूर कॉर्डिनेटर सहभागी झाले आहेत.

चतुर्थ श्रेणीतील गँगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. हे पथक पाच दिवसांनंतर मायदेशात परतणार आहे. पश्चिम रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सहल आखण्यात आली, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.

 

थॉमस अँण्ड कूक यात्रा कंपनीसह पश्चिम रेल्वेनं करार केला आहे. त्यानुसार चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना कमी किंमतीत विदेश दौरा उपलब्ध करून दिली. या सहलीसाठी कर्मचाऱ्यांकडून एकूण खर्चापैकी फक्त ३३ टक्के रक्कम घेण्यात आली. रेल्वेनं टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग देऊन या कर्मचाऱ्यांना रवाना केलं. कर्मचारी कल्याण निधीतून या सहलीचं आयोजन करण्यात आलं.