नेहरू विज्ञान केंद्राच्या नव्या गॅलरीत तंत्रज्ञानप्रेमींसाठी पर्वणी; पेंग्विन, डॉल्फिनच्या गुदगुल्या आणि एकाग्रतेवर उडणारे ड्रोन

आपल्या समोरच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून फक्त आपल्या एकाग्रतेच्या क्षमतेवर एखादे ‘ड्रोन’ उडविता आले तर? खरंच, किती भन्नाट कल्पना आहे ना ही! पण ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे, मुंबईतील वरळी येथील ‘नेहरू विज्ञान केंद्रा’च्या ‘मशिन्ड टू थिंक’ या नव्या गॅलरीमध्ये. विज्ञान आणि तंत्रप्रेमींना चौथ्या औद्योगिक क्रांतीची झलक दाखविणाऱ्या या गॅलरीमध्ये संगणकीय युगाचा उदय, संगणक क्षेत्रातील क्रांती व उत्क्रांती आणि नवनवीन तंत्रज्ञान यांची ओळख करून देण्यात येणार आहे. नेहरू विज्ञान केंद्रामध्ये साकारत असणारी ही गॅलरी येत्या ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने सर्वाकरिता खुली करण्यात येणार आहे.

नेहरू विज्ञान केंद्रातील पूर्वीच्या ‘संगणक’ गॅलरीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्याजागी चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आढावा दाखविणारी ‘मशिन्ड टू थिंक’ नावाची एक नवीन गॅलरी लवकरच विज्ञानप्रेमींसाठी खुली करण्यात येणार आहे. या गॅलरीच्या प्रवेशद्वारातच असलेल्या काचेमधून गॅलरीची एक झलक आपल्याला बघता येईल. त्यापुढचे आश्चर्य म्हणजे ही फक्त एक काच नसून पारदर्शी स्क्रीन आहे. या स्क्रीनला हात लावल्यानंतर मोजमापासाठी प्राचीन काळामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची माहिती पाहायला मिळते. यासोबतच गणितीकरण सोपे होण्यासाठी काळानुसार यंत्रांचा उदय कसा झाला इथपासून ते संगणकाची निर्मिती या कालखंडाचा आढावाही या स्क्रीनवर उपलब्ध असणार आहे.

गॅलरीच्या डाव्या बाजूला गणिती आकडेमोडीसाठी १९३० सालापासून उदयास आलेले विविध तंत्रज्ञान प्रत्यक्ष त्या काळातील यंत्रांसह पाहावयास मिळणार आहे. यामध्ये मग सुरुवातीला मोठय़ा टेबलाएवढय़ा आकाराच्या गणकयंत्रापासून काळानुसार बदल घडत संगणक कसा उदयास आला हे तर पाहायला मिळतेच पण खरी गंमत आहे ती यंत्राच्या बाहेरच्या बाजूस असलेली सरकणारी स्क्रीन.

ही स्क्रीन एकेका यंत्राच्या समोर नेल्यास त्या-त्या यंत्राचा तसेच त्या कालखंडातील इतर यंत्रांचा इतिहास दाखविते.

जवळपास १९३० सालापासून ते अगदी २०१० पर्यंत अशा सात दशकांचा इतिहास या स्क्रीनमध्ये सामावलेला आहे.

गॅलरीत काय काय?

  • मोबाइलच्या स्क्रीनला स्पर्श केल्यानंतर जसे अ‍ॅप्लिकेशनवर काम करता येते, तसेच कोणत्याही वस्तूच्या माध्यमातून स्पर्शाचे तंत्रज्ञान वापरता येते, हे सिद्ध करणारा प्रयोगही गॅलरीमध्ये मांडला आहे.
  • पारदर्शी टीव्ही, रुबिक-क्यूब सेट करणारे रोबोटिक उपकरण, लाकडी तुकडय़ांच्या विशिष्ट रचनेतून साकारणारे आकार आणि छायाचित्रे असे एकापेक्षा एक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे चमत्कार या गॅलरीमध्ये पाहावयास मिळणार आहेत.
  • सॅटेलाइटच्या माध्यमातून पृथ्वीच्या भूपृष्ठाचे छायाचित्र कसे दाखवले जाते, हे पांढऱ्या वाळूच्या साहाय्याने आणि काईनेक्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गॅलरीमध्ये प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

पेंग्विन, डॉल्फिनच्या गुदगुल्या

या गॅलरीतला सर्वात थक्क करणारा प्रकार म्हणजे संवंर्धित वास्तविकता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेला वैज्ञानिक प्रयोग. यामध्ये तुम्ही उभे राहिलेल्या समोरच्या भिंतीवरील स्क्रीनमध्ये समुद्रकिनारा दिसत असतो आणि त्यामध्ये तुम्ही त्या किनाऱ्यावर उभे असल्याचा आभास होत असतो. यामध्ये मग हळूच पेंग्विन, डॉल्फिन तुमच्या पायाजवळ येऊन गुदगुल्या करू लागतात आणि हे चित्र अगदी खरे असल्याचे भासायला लागते.

मेंदूची एकाग्रता क्षमतेची मोजणी

या गॅलरीतल्या एका मोठय़ा स्क्रीनवर असलेल्या ‘ब्रेनव्हेव’च्या माध्यमातून तुमच्या मेंदूची एकाग्रता क्षमता मोजता येते. कपाळ आणि कानाशी जोडणारे यंत्र लावल्यानंतर समोरच्या स्क्रीनवर एकाग्रतेने पाहिल्यानंतर काही क्षणातच बाजूलाच काचेमध्ये असलेले ड्रोन उडायला सुरुवात होते. जितकी एकाग्रता क्षमता अधिक तितक्या उंचावर ड्रोन उडते. फेसबुक, गुगल अशा समाजमाध्यमांवर असणारी आपली माहिती नेमकी कुठे साठवली जाते, इतक्या मोठय़ा माहितीच्या जंजाळातून आपलीच माहिती आपल्याला कशी दाखविली जाते याची प्रात्यक्षिके दाखविणारे प्रयोगही या गॅलरीमध्ये पाहायला मिळणार आहेत.

बायोइन्फॉमॅटिक्सतंत्रज्ञानाची मदत

‘बायोइन्फॉमॅटिक्स’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या शरीराचा सांगाडा समोरच्या स्क्रीनवर पाहता येणार आहे. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाजणारा पियानो आणि नैसर्गिक स्वभाव (नॅचरलस्टिक बिहेव्हिअर) तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेले मासे असे अनेक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे आविष्कार तंत्रप्रेमींना पाहण्याची संधी या गॅलरीमध्ये मिळणार आहे.

Story img Loader