मुंबई : चेंबूरमध्ये नुकत्याच मृत्यू पावलेल्या कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, ही एक गंभीर समस्या असून याकडे कांदळवन कक्ष आणि ठाणे वन विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिला आहे.

एक महिन्यापूर्वी वेगवेगळ्या दिवशी चेंबूर परिसरात पाच अशक्त जखमी कोल्हे आढळले होते. याबाबत तक्रार दाखल होताच वनविभागाने मदतकार्य हाती घेतले. यादरम्यान कोल्ह्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उद्यानातील वैद्याकीय विभाग आणि रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर (रॉ) संयुक्तपणे जखमी कोल्ह्यांवर उपचार करीत होते.यापैकी चार कोल्ह्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका कोल्ह्याचा रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत झाला होता.

हेही वाचा >>>दादरमध्ये वाहतूक कोंडी; ‘बेस्ट’ मार्गात बदल करण्याची नामुष्की

यापैकी एका कोल्ह्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांना त्याच्या हालचालींमध्ये फरक जाणवू लागला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्या कोल्ह्याचा मृत्यू झाला. त्याच्या हालचालींमधील फरक लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याची रेबीज चाचणी करण्याचे सुचविले. यानुसार मृत कोल्ह्याच्या मेंदूचे नमुने मुंबईतील पशुवैद्याकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. चाचणीच्या अहवालानुसार या कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मुंबईत रेबीजमुळे वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.