एका खरेदी विक्री संकेतस्थळाची गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आला. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील भामट्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइल तयार करून तोतयागिरी केली आहे.
आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.फणसळकर यांचे गणवेशातील छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलिस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त(अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले.
सायबर फसवणुकीने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, आयकर विभागाचे मुंबई प्रमुख, महावितरणचे एमडी, वरिष्ठ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांना याच पद्धतीचा वापर करून फसणूक करण्याचा प्रयत्न केला होता.