मुंबई : सहलीसाठी पुरातन बंगला भाड्याने देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामट्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. आकाश जाधवाणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत अनेकांना गंडविल्याचा संशय आहे.

गावदेवी परिसरात वास्तव्यास असलेले तक्रारदार दादर येथे सनदी लेखापाल (सीए) म्हणून नोकरी करतात. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी इन्स्टाग्रामवर पर्यटनस्थळांचा शोध घेतला. तेव्हा, ‘हेरीटेज स्टे’ या नावाची एक जाहिरात त्यांना दिसली. त्यांनी जाहिरातीमधील लिंक ओपन करताच ‘हेरीटेज स्टे’ नावाचे व्हाट्स ॲप चॅटबोट ओपन झाले.

हेही वाचा >>>फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाच्या वर्तनाबाबतचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

पत्नीने अधिक माहिती घेण्यासाठी हे चॅटबोट पतीला पाठवले. त्याने अधिक चौकशी करून लोणावळा येथे एकूण २० जणांसाठी २८ ते ३० जून अशा दोन दिवसांसाठी बंगल्याची नोंदणी केली. निशंगत असे नाव सांगणाऱ्या भामट्याने २० जणांसाठी दोन दिवसाकरिता बंगल्याचे भाडे एक लाख पाच हजार रुपये सांगितले. तसेच, त्याने आगाऊ ४० हजार रुपये मागितले. निशंगतच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने ४० हजार रुपये भरले. पैसे घेतल्यानंतर निशंगतने संपर्क करणे बंद केले. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पुढील व्यवहार टाळले. याच दरम्यान जाधवानीला अटक झाल्याचे समजताच तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.