लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या सोडतीमध्ये कलाकार कोट्यातील घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची भामट्याने साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घाटकोप पश्चिम येथे राहणारे चंद्रकांत मानकर यांच्या एका मित्राने मुलुंड परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर त्यांची ओळख करून दिली होती. तसेच तो मंत्रालयात नोकरीला असून म्हाडाचे कलाकार कोट्यातील घर तो कमी किमतीत मिळवून देईल, असेही सांगितले होते. तक्रारदारांना घराची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ कन्नमवार नगर परिसरात एखादे घर शोधण्यास सांगितले. सदर व्यक्तीने तत्काळ या परिसरात २५ लाख रुपयात घर असल्याचे सांगितले. त्याने आगाऊ रक्कम म्हणून मानकर यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर म्हाडाचे एक बनावट पत्र दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
आणखी वाचा-मुंबई : पाच तास ‘पीआरएस’ बंद राहणार
मानकर यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आणखी साडेतीन लाख रुपये दिले. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही त्याने मानकर यांना घर दाखवले नाही. त्यानंतर सदर व्यक्तीने त्याचा फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे मानकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत.