स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्थानिक राजकीय पदाधिकारी व सरकारी अधिकाऱ्यासह ११ जणांचा समावेश असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.तक्रारदार चेतन जायगडे विलेपार्ले येथील येथील रहिवासी आहे. एका निवृत्त पोलिसाच्या माध्यमातून जायगडे यांची नवीन सिंह गोरखा याच्याशी ओळख झाली होती. त्याने गोरेगाव पूर्व येथे एक कंपनी सुरू करून गरीबांना १२ लाख रुपयांत अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरा घर देण्याचे आमीष दाखवले. सुरुवातीला चार लाख रुपये धनादेशाद्वारे व पाच लाख रुपये रोख रक्कम द्यावी लागेल. तसेच घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरीत रक्कम द्यावी लागेल असे जायगडे यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदाराने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी धनादेशाद्वारे रक्कम कंपनीच्या खात्यावर हस्तांतरित केली.
हेही वाचा >>>बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली
उर्वरीत काही रक्कम रोख स्वरूपात दिली. त्यानंतर जायगडे यांना बनावट कागदपत्रे देण्यात आली होती. या प्रक्रियेत एमएमआरडीएतील कथित अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे जायगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याने जायगडे यांना दिलेली कागदपत्रे खरी असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर घराचा ताबा देण्यासाठी चालढकल करण्यात येऊ लागली. त्यामुळे जायगडे यांना संशय आला. त्यांनी आरोपीने दिलेली कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जायगडे व फसवणूक झालेल्या इतर व्यक्तींनी आरोपींबरोबर बैठक घेतली. अशी कोणतीही योजना नसून आरोपींनी स्वतःच्या वापरासाठी संबंधित रक्कम घेतल्याचे बैठकीत लक्षात आले. आरोपीने जायगडे यांचे पैसे परत करण्याची लेखी हमी दिली. पण त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.