मुंबई : टोरेस गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्रकरण ताजे असताना दादर जवळील प्रभादेवी परिसरात रक्कम दामदुपट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्यापासून सुनील गुप्ता याने प्रभादेवी परिसरात कार्यालय थाटून ४५ दिवसांत रक्कम दापदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेतले. याप्रकरणी बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा अधिनियम (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गुप्ताला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सुमारे एक हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्रभादेवी येथील सयानी रोड परिसरात आरोपी गुप्ताने पॉकेट फ्रेन्डली इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सी नावाने कार्यालय उघडले होते. सुरूवातील त्याने ३० दिवसांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याची योजना सुरू केली होती. त्यानंतर ४५ दिवसांमध्ये रक्कम दामदुपट करण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपी सुनील गुप्ताला दादर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) व एमपीआयडी कायदा कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
याप्रकरणातील तक्रारदार माहिम परिसरातील रहिवासी असून ते बेस्टमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी नुकतीच दादर पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, त्याच्या परिचित व्यक्तीने त्यांना गुप्ताकडे दामदुपट रक्कम मिळवून देण्याची योजना सुरू असल्याचे सांगितले. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये तक्रारदार त्याच्या कार्यालयात गेले. त्यावेळी कार्यालयत खूप गर्दी होती. रक्कम दिल्यानंतर गुप्ता पांढऱ्या रंगाची पावती द्यायचा. त्यात गुंतवणूकदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, रक्कम दिल्याचा दिनांक नमुद केलेला होता. तक्रारदारांनी स्वतः दीड लाख व त्याच्या परिचित आठ व्यक्तींनी मिळून आठ लाख ८० हजार रुपये गुप्ताकडे गुंतवले होते. त्यानंतर तक्रारदारांना एका महिन्यानंतर दुप्पट रक्कम मिळाली नाही. तसेच त्यांची मुद्दलही त्यांना परत मिळाली नाही. मागील काही दिवसांपासून गुप्ताने कार्यालयही बंद केले होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गुप्ताला अटक केली आहे. आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. ५० हजार, एक लाख अशी रक्कम गुंतवणूकदारांनी गुंतवली आहे. १० लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदाराही असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी सुमारे एक हजार गुंतणूकदार असल्याचा संशय असून फसवणूकीची रक्कम कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आरोपीचा लॅपटॉप व इतर कागदपत्रांची तपासणी करणे अद्याप बाकी आहे.