फसवणूकप्रकरणी तामिळनाडू पोलीस शोध घेत असलेल्या आरोपीला सहार पोलिसांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून अटक केली. आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) काढण्यात आले होते.
अरविंदकुमार त्रिपाठी असे या आरोपीचे नाव असून तो तामिळनाडू येथे फसवणुकीच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अरविंदकुमारविरुद्ध २०१३ तामिळनाडूच्या एका स्थानिक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला. तो विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलिसांनी एलओसी जारी केले होते. दुबईला जाण्यासाठी तो शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याला विमानतळावरील इमिग्रेशन अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात आल्याने त्याच्या अटकेची माहिती तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी वांद्रे येथे सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी तामिळनाडू पोलीस आले नसल्याने त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. तसेच त्याला लवकरच तामिळनाडू येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.