मुंबई : अमेरिकन वाणिज्य वकिलातीमध्ये बनावट कागदपत्र सादर करून व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुजरातमधील नागरिकासह तीन दलालांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दलालांनी या व्यक्तीला बनावट कागदपत्रे पुरवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी निरंजन पटेल (३६) गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. तो सोमवारी अमेरिकन वाणिज्य वकिलातीमध्ये मुलाखतीसाठी गेला होता. त्याने सादर केलेल्या दस्तऐवजांच्या पडताळणीदरम्यान अधिकाऱ्यांना काही विसंगती आढळली. दरम्यान, यापूर्वी पटेलने कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु त्यावेळी खोटा अमेरिकन व्हिसा सादर केल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळला होता. ही बाब समजल्यानंतर वकिलातीमधील अधिकाऱ्यांची त्याची कसून चौकशी केली. बनावट कागदपत्र कोठे तयार केली, याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. आपल्याला संबंधित बनावट कागदपत्रे तीन दलालांनी दिली असून त्यांची नावे सोनल, उदय रावल आणि पियुषकुमार पटेल असल्याचे त्याने सांगितले. आरोपी दलालांनी त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारी म्हटले आहे.
हेही वाचा…भांडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसालाच मारहाण
सहाय्यक विभागीय सुरक्षा अधिकारी जेम्स बिलिंगटन यांनी याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पटेल व तीन दलालांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात बनावट कागदपत्र तयार करणे, ती सादर करणे, फसवणूक करण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.