मुंबईः व्यावसायिकाची गुजरातमधील व्यक्तीने दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. या फसवणुकीच्या रक्कमेतून आरोपीने बंगला बांधला, तसेच दुबईतून दागिने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालाड येथील रहिवासी व्यावसायिक भाविनकुमार शाह (४७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुजरातमधील श्रीकांत श्रीवास्तव (३३) विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा >>> भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त
शाह यांच्या पोलीस तक्रारीनुसार, २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान श्रीवास्तवने शाह यांच्या कंपनीची एकूण २ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. ही रक्कम श्रीवास्तव याने त्याची पत्नी, आई, बहीण, मित्र व कार्यालयात काम करणाऱ्यांच्या नावावर वळवल्याचा आरोप आहे. तसेच या फसवणूक केलेल्या पैशांतून श्रीवास्तवने पत्नीच्या नावे एक बंगला खरेदी केला आहे. तसेच दुबई येथून ४ लाख १६ हजार ५९६ रुपयांचे सोने खरेदी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.